
🛒 अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी 72 तासांचा नियम
👩🦰 अंजली आणि रत्ना
अंजली आणि रत्ना ह्या दोन खुप जवळीच्या मैत्रिणी. दोघीही सरकारी नोकरी करतात आणि पगार भरपूर परंतु दोघींनाही पगार पुरत नाही. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी फिरणे, मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे आणि रात्री जेवण करूनच घरी जाणे असं बराच वेळा दोघी करतात. आहे तो पगार सर्व खर्च होतो, आज पंधरा वर्षे झाली नोकरी करून तरी बाजूला काही पैसे पडत नाहीत. असेच एका दिवशी दोघी गप्पा मारत होत्या, यावरती काहीतरी विचार आपल्या दोघींनाही करावा लागेल, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. कल्पना सुद्धा त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करते, पगार तेवढाच पण आज तिच्याकडे १५ वर्षात जवळ जवळ ७५ लाखाच्यावर गुंतवणूक आहे. योग्य आर्थिक नियोजन करून कल्पना दर दोन-तीन वर्षात विदेशी ट्रीप पण करते. “आम्ही दोघी फार पैसे उधळ्या आहोत मॉलमध्ये गेले आणि काही ऑफर दिसली की करा खरेदी. अग, कल्पना तू कशी काय कंट्रोल करते ग तुझा खर्च?” मैत्रिणिनो, मला पण भूरळ घालतात ना ह्या सर्व ऑफर, पण मी कुठलीही खरेदी करताना ७२ तासाचा नियम वापरते. “काय आहे तो ७२ तासाचा नियम जरा आम्हाला पण सांग की.”
⏳ 72 तासांचा नियम म्हणजे काय?
आजच्या वेगवान जीवनशैलीत, जाहिराती, सवलती, आणि “फ्लॅश सेल्स”, अमेझॉन फेस्टिव्ह सेल यामध्ये हरवून जाणे खूप सोपे झाले आहे. अशा वातावरणात, आपण वारंवार भावनिक निर्णय घेऊन अशा गोष्टी खरेदी करतो ज्या खरोखरच आवश्यक नसतात. हे केवळ अनावश्यक खर्चाला कारणीभूत ठरतेच, पण आपल्या घरात नको असलेला सामानही जमा होते.
यावर उपाय म्हणून 72 तासांचा नियम उपयुक्त ठरतो. हा नियम तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि तुम्हाला अधिक विचारपूर्वक खरेदीचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.
72 तासांचा नियम
72 तासांचा नियम अगदी सोपा आहे:
माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, “तुला जर कुणाचा खूप राग आला तर तू ५० वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हण आणि मग समोरच्याला उत्तर दे.” असं केल्याने राग शांत होतो. जर तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची तीव्र इच्छा झाली, तर ती खरेदी करण्याआधी 72 तास थांबा. या वेळेत तुम्हाला शांतपणे विचार करण्याची संधी मिळते आणि त्या गोष्टीची खरी गरज आहे का हे ठरवता येते.
जर 72 तासानंतरही तुम्हाला वाटत असेल की ती गोष्ट खरोखरच उपयुक्त आहे, तुमच्या बजेटमध्ये बसते, आणि तुमच्या गरजांशी सुसंगत आहे, तरच ती खरेदी करा. अन्यथा, तुम्ही एका अनावश्यक खरेदीपासून स्वतःला वाचवले असे समजा.
💡 हा नियम का प्रभावी आहे?
- आवेशावर नियंत्रण: बर्याच खरेदी भावना आणि क्षणिक आकर्षणामुळे होतात. 72 तासांची वाट पाहणे तुमच्या निर्णयाला तर्कशुद्ध बनवते.
- आर्थिक सजगता: हा नियम तुम्हाला तुमच्या खर्चाचा आणि आर्थिक उद्दिष्टांचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.
- खरेदी पश्चात खंत टाळते: बर्याच वेळा आपण खरेदी केलेल्या वस्तूंवर पश्चात्ताप करतो. 72 तासांची वाट पाहिल्यास हे टाळता येते.
- गोंधळ कमी करतो: अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळल्यामुळे तुमच्या घरातले आणि जीवनातील गोंधळ कमी होतो.
📋 72 तासांचा नियम कसा लागू करावा?
- यादी तयार करा: खरेदीची तीव्र इच्छा झाली की, ती गोष्ट यादीत लिहून ठेवा. त्यासोबत किंमत आणि ती खरेदी का करायची आहे याचा उल्लेख करा.
- स्मरणपत्र द्या: तुमच्या फोनमध्ये 72 तासांसाठी रिमाइंडर लावा.
- स्वतःला प्रश्न विचारा:
- ही गोष्ट गरजेची आहे का, की फक्त आकर्षण आहे?
- ती माझ्या जीवनात काही मूल्य वाढवेल का?
- माझ्या बजेटमध्ये तिच्यासाठी जागा आहे का?
- यासाठी कोणताही स्वस्त किंवा पर्याय उपलब्ध आहे का? कुठलाही खर्च करताना ती गरज आहे की फक्त इच्छा आहे हे स्वत:ला विचारणे गरजेचे आहे.
- निर्णय घ्या: 72 तासांनंतर यादीतील वस्तूचा विचार करा. ती खरेदी करायची आहे का नाही हे ठरवा.
💰 72 तासांचा नियम पाळल्याचे फायदे
- आर्थिक बचत: अनावश्यक खरेदी टाळल्यामुळे तुमचे पैसे बचत, गुंतवणूक किंवा आवश्यक खर्चासाठी वापरता येतात.
- स्वयंशिस्त निर्माण होते: आवेशाला विरोध करण्याची सवय तुम्हाला इतर क्षेत्रातही मदत करू शकते.
- सजग खरेदी: विचारपूर्वक खरेदी केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वस्तूंबद्दल समाधान मिळते आणि तुमच्या जीवनशैलीत अधिक शिस्त येते.
🛑 72 तासांचा नियम लागू न करण्याच्या काही अपवाद
- आवश्यक गोष्टी: औषधे, अन्नपदार्थ किंवा इतर मूलभूत गरजा यासाठी हा नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
- सवलतीत असलेल्या नियोजित खरेदी: जर तुम्ही आधीपासून एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार केला असेल आणि सवलतीची संधी मर्यादित असेल, तर निर्णय वेळीच घ्या. पण विचारपूर्वक!
निष्कर्ष
72 तासांचा नियम म्हणजे स्वतःला निर्बंध घालणे नव्हे, तर विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय लावणे आहे. अनावश्यक खरेदी टाळण्याचा हा साधा उपाय तुमचे पैसे, वेळ, आणि ऊर्जा वाचवतो.
चला तर आजपासून 72 तासांचा नियम पाळून बघा. अंजली आणि रत्ना यांच्यासारखा वेळ वाया नका घालवू. तुमचे आर्थिक निर्णय अधिक सजग होतील, आणि तुम्हाला खरेदीचे समाधानही अधिक मिळेल. एक साधा नियम आहे, तुम्ही किती पैसे मिळवता याला काही अर्थ नाही, परंतु त्या पैशातून तुम्ही किती बचत करता आणि त्यातून किती गुंतवणूक करता यावर तुम्ही किती लवकर अर्थसंपन्न व्हाल हे ठरत असते.
ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे
माझे इतरही काही अर्थविषयक लेख तुम्ही माझ्या www.caramdaware.com ह्या वेबसाईटवर ब्लॉग वर जाऊन वाचू शकता .