शेती ,शेतकरी आणि आयकर कायदा

शेती, शेतकरी आणि आयकर कायदा: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🌾💰

शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. ह्या व्यवसायासमोर अनेक आव्हाने सुद्धा आहेत. नेत्यांचे शेतीपासून असणारे कोटीच्या कोटी उत्पन्न हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. अनेक आव्हाने असताना नेते मंडळी एवढे मोठे शेती उत्पादन कसे घेतात यावर सोशल मीडियावर शेती कशी करावी हे नेत्यांकडून शिकावे असे विनोद अनेकदा आपण ऐकतो.

शेती उत्पन्नला आयकर नाही, शेती विक्री करून येणाऱ्या रकमेवर आयकर आहे कि नाही असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गासमोर आहे, ह्या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेख प्रपंच आहे.

१. शेती उत्पन्नावर आयकर आहे का? 🤔

फक्त शेतीचे उत्पन्न एखाद्या व्यक्तीला आहे आणि त्याला दुसरे कुठलेही उत्पन्न नाही तर त्याला आयकर भरावा लागत नाही. परंतु शेती उत्पन्नासोबत त्याला इतरही उत्पन्न असेल तर शेती उत्पन्न आणि इतर उत्त्पन्न हे दोन्ही एकत्र करून त्यावर आयकर भरावा लागतो .

  • म्हणजेच शेती उत्पन्नासोबत इतर करपात्र उत्पन्न असेल तर शेती उत्पन्नावर सुद्धा आयकर भरावा लागतो .
  • एखादी पगारदार व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती आहे त्याला पगाराचे किंवा व्यवसायाचे उत्पन्न आहे व त्याला शेतीपासून सुद्धा उत्पन्न आहे तर त्याला पगार, व्यवसाय उत्पन्न व शेती हे सर्व उत्पन्न एकत्र करून त्यावर आयकर भरावा लागतो.
  • म्हणजेच फक्त शेती उत्पन्न असेल तरच ते आयकर मुक्त आहे. इतर उत्पन्न व शेती उत्पन्न असे एकत्रित उत्त्पनवर आयकर कसा काढायचा याची वेगळी पद्धत सुद्धा आयकर कायद्यात दिलेली आहे.

२. शेती विक्री केली तर त्यावर आयकर लागेल काय? 💸

आयकर कायद्यात शहरी भागातील शेती आणि ग्रामीण भागातील शेती असे दोन प्रकार केले आहे. कोणत्या शेतीला ग्रामीण शेती म्हणावी व कोणत्या शेतीला शहरी शेती म्हणावी याची व्याख्या सुद्धा आयकर कायद्यात दिलेली आहे.

  • जर शहरी भागातील शेती विकली तर तर येणाऱ्या रकमेवर आयकर भरावा लागतो.
  • जर ग्रामीण शेती विकली तर त्यावर आयकर भरावा लागत नाही.
  • पण शहरी भागातील शेती विकून येणाऱ्या पैशातून जर ग्रामीण भागात शेती विकत घेतली तर आयकर भरावा लागत नाही.

महत्त्वाची काळजी: शेती विक्री करताना एक महत्वाची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी शेतीचे सरकारी मूल्यांकन हे कमी आहे व शेती चे भाव किंवा मार्केट किंमत जास्त आहे.

  • शेतकरी सरकारी मुल्याकंन नुसार खरेदी चे दस्त किंवा खरेदी खत करतात व बाकी रक्कम रोख स्वरूपात घेतेता व ती रक्कम बँके मध्ये भरतात व हि रक्कम मोठी असते.
  • शेतकरी सरकारी मुल्यांकन नुसार खरेदी चे दस्त किंवा खरेदी खत करतात व बाकी रक्कम रोख स्वरूपात घेतेता व ती रक्कम बँके मध्ये भरतात व हि रक्कम मोठी असते.
  • शेती विक्री करून आलेल्या रकमेवर आयकर नाही ह्या गैरसमजुतीतून अशी रक्कम बँक खात्यात भरली जाते परंतु तुमचे खरेदी खता मध्ये ज्या रकमेचा विक्री व्यवहार दाखवलेला आहे तीच रक्कम हे तुमचे शेती विक्री चे उत्प्प्न्न धरले जाते. बँक खात्यात तुम्ही त्या व्यतिरिक्त रक्कम भरली असेल जरी ती शेती विक्रीची असेल तर त्यावर आयकर भरावा लागतो.
  • तुमच्या बँक खात्यात मोट्या प्रमाणात रक्कम भरली असेल किंवा बँक खात्यातून रक्कम काढली असेल तर असे व्यवहार आयकर खात्याला कळविणे बँकांवर बंधनकारक आहे.
  • तसेच शेती खरेदी विक्री चे दस्त जिथे नोंदविले जातात त्या नोंदणी कार्यालयाला सुद्धा असे व्यवहार आयकर खात्याला कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता खरेदी विक्री व्यवहाराची माहिती हि सहजपणे आयकर खात्याकडे उपलब्ध असते.
  • तसेच ग्रामीण शेती विक्रीकरून आलेली रक्कम जरी आयकर मुक्त असेल आणि आलेली रक्कम तुम्ही बँकेत मुदत ठेव मध्ये ठेवली असेल तर त्यावर येणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागेल.
  • तसेच शेती विक्री करून येणाऱ्या रकमेतून गाळा (शॉप ) घेतले आहे व त्या शॉप चे भाडे येत आहे तर त्यावर सुद्धा आयकर भरावा लागेल.

३. शेती उत्पन्नातून घर घेतले तर? 🏡

शेती उत्पन्नातून घर घेतले आणि मी ते विकले आणि त्या येणाऱ्या रकमेतून दुसरे घर घेतले तर आयकर भर लागणार नाही. जर दुसरे घर घेतले नाही तर आयकर भरावा लागेल.

४. शेती सरकारणे अधिग्रहित केली तर? 🚧

जर ग्रामीण शेती अधिग्रहित केली तर त्यावर आयकर भरावा लागणार नाही पण शहरी शेती अधिग्रहित केली तर टॅक्स भरावा लागेल.

५. ग्रामीण शेती बिनशेती करून विकली तर? 🏜️

ग्रामीण शेती हि बिनशेती करून विक्री केली तर त्यावर आयकर भरावा लागेल.

६. कागदपत्रे काय ठेवावी? 📜

फक्त शेती उत्पन्न पूर्ण करमुक्त आहे परंतु त्यासाठी शेतकऱ्याने काही कागतपत्रे ठेवावी लागतात काय? जसे वर आपण बघितले कि फक्त शेती उत्पन्न हे आयकर मुक्त आहे तरीही जे मोठे शेतकरी आहे ज्याचे शेती जास्त प्रमाणात लागवडीखाली आहे व उत्पन्न सुद्धा जास्त आहे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  • मोठे शेतकरी जे आहे ज्यांचे द्राक्ष, ऊस, डाळींब व इतरही शेती उत्प्प्नन आहे त्यांनी रोख व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. जमिनीच्या सातबारा वर घेण्यात येणाऱ्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे ,
  • शेतमाल विक्री ची बिले घेणे व विक्री चे पैसे चेक किंवा आर टी जि एस ने घ्यावे .
  • तसेच लागवड खर्चात मजुरी हा मोठा खर्च आहे मजुरांच्या चेकने किंवा बँक खात्यात वर्ग करावा , कीटकनाशके, बी बियाणे ह्या खर्चाचे सुद्धा बिले घेणे आवश्यक आहे . रोख खर्च शक्यतो टाळावे .
  • बँक खात्यात रोख रक्कम भरणे किंवा काढणे असे व्यवहार हे आयकर खात्याकडे आता सहजपने उपलब्ध होत आहे त्यामुळे असे रोख व्यवहार टाळावे नाही तर विनाकारण आयकर चौकशी ला सामोरे जावे लागते .

जसे सुरवातीलाच सांगितले कि शेती उत्प्प्नन दाखवून अनेक जण आयकर चोरी करतात परंतु आयकर खाते सुद्धा आता खूप सजग झाले आहे . किती एकर जागेतून कुठल्या पिकापासून किती उत्पन्न येते, लागवड खर्च किती येतो ह्याचा काही सर्व्ह सुद्धा आयकर खात्याने केलेला आहे त्यामुळे शेती उत्प्प्नन आयकर विवरण पत्रामध्ये दाखवताना आयकर दात्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

७. आयकर विवरणपत्र भरायचे का? 🤔

फक्त शेती उत्प्प्नन आहे तरी त्या शेतकऱ्याने आयकर विवरण पत्र (रिटर्न) भरणे गरजेचे आहे का? ज्यांना फक्त शेती उत्प्प्नन आहे त्यांनी आयकर विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक नाही. परंतु आयकर खात्याला तुमच्या पॅन नंबर वरून खूप सारी माहिती विनासायास उपलध होत असते.

  • जसे कि बँकेत मोट्या सकमेच्या मुदत ठेवी करणे व त्यावर मिळणारे व्याज ,
  • जमिनीची खरेदी विक्री ,
  • मोट्या प्रमाणात खर्च केलेले विदेश दौरे,
  • शेती उत्प्प्नतुन शेअर्स व म्युचल फंड खरेदी करणे,
  • मोट्या किमतीच्या कार खरेदी करणे,
  • गाळा किंवा शॉप खरेदी करणे असे मोठे व्यवहार असतील तर आयकर विवरण पत्र दाखल करून त्यात ते दाखविणे हे केव्हाही चांगले आहे. वरील मोठे व्यवहार असतील तर आयकर विवरण पत्र दाखल करून नंतर येणारी आयकर चौकशी टाळता येते .

शेती संबंधित लोकांनी शेतीला आयकर नाही अशी समजूत करून घेऊ नये व योग्य ती काळजी घ्यावी . आयकर चौकशी नोटिसा ह्या नेहमी आर्थिक वर्ष संपून गेल्यानंतर येतात व नंतर काही आयकर भरावयास आला तर त्यावर दंड व व्याज सुद्धा भरावे लागते.

👉📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *