
उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब 💡
नुकत्याच एका उद्योजक सेमिनारमध्ये एकाने मला प्रश्न विचारला की उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब कोणती किंवा उद्योजकाने कशाला महत्व देणे गरजेचे आहे? हाच प्रश्न मी सेमिनार मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना विचारला. कुणाचे उत्तर आले की मार्केटिंग महत्त्वाचे आहे, कुणाचे उत्तर आले की व्यवसायात आजकाल टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे, कुणाचे उत्तर आले की व्यवसायात लेबर ला किंवा माणसांना महत्त्व आहे, कुणाचे उत्तर आहे कमी किंमत आणि दर्जेदार प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस याला महत्व आहे.
मी त्यांना एक गोष्ट सांगितली की रतन टाटा यांना कार मॅन्युफॅक्चरिंग बद्दल किंवा कार प्रोडक्शन बद्दल किंवा कार चे मार्केटिंग बद्दल जर काहीही माहीत नसेल तर त्यांचा व्यवसाय चालू शकेल का? सर्वांनी उत्तर दिले की चालू शकेल. मग मी त्यांना विचारलं की रतन टाटांना एक महत्त्वाची कोणती गोष्ट माहिती असायला हवी कि जी व्यवसायासाठी फार म्हत्वाची आहे? कुणालाही उत्तर देता येत नव्हते, परंतु ते उत्तर म्हणजे स्वतःच्या व्यवसायाची आर्थिक पत्रके वाचता येणे.
आर्थिक पत्रके: यशाचा मार्ग 📊
कुठल्याही व्यवसाय म्हटल्यानंतर त्या व्यवसायामध्ये हे दोन आर्थिक पत्रके तर तयारच केली जातात त्यामध्ये एक आहे नफा तोटा पत्रक (Profit and Loss Account) आणि दुसरे आहे ताळेबंद (Balance Sheet). हे दोन्ही आर्थिक पत्रके ज्या उद्योगपतीला वाचता येतील आणि समजतील तोच व्यवसायात यशस्वी होणार आहे.
सेमिनार मधील सर्वजण जरा टेन्शन मध्ये आले की आम्ही सर्वजण नॉन फायनान्स मधील आहोत त्यामुळे हे सर्व बघण्याची जबाबदारी आमचे जे कन्सल्टंट आहे किंवा आमचे जे काही फायनान्स डिपार्टमेंट आहे त्यांची आहे. परंतु फायनान्स डिपार्टमेंट चे काम हे फक्त झालेल्या व्यवहाराची नोंद ठेवणे आणि त्यानुसार आर्थिक पत्रके बनवणे हे आहे.
फायनान्स डिपार्टमेंट: रन किपर 🏏
त्यांना मग मी क्रिकेट च्या खेळाबद्दल माहिती विचारली कि क्रिकेट चा खेळ जिंकाययांचा असेल तर खेळाडूंनी खेळले आणि रन केले तरच जिकंता येईल. खेळाडू खेळतात रन करतात व जिकंतात. रन होत असताना त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम हे रन किपर चे असते. व्यवसायात फायनान्स डिपार्टमेंट चे काम हे रन किपर सारखे आहे कि झालेल्या व्यवहाराची नोंद ठेवतात व ते एका फॉरमॅट मध्ये सादर करतात.
उद्योजकांनी स्वतःच्या व्यवसायाची आर्थिक पत्रके वाचायला आणि ती समजून घ्यायला शिकले पाहिजे कारण ते जर समजले नाही तर तुमचा व्यवसाय नक्की कुठे चालला आहे तुमचा व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात आहे तुमचा व्यवसायाला पुढे भवितव्य काय आहे हे तुम्हाला समजणार नाही. अनेक उद्योजक असं सांगतात की आर्थिक पत्रके तयार करणे आणि ती समजून घेणे हे काही उद्योजकाचे फार महत्त्वाचं काम नाही माझा उद्योग जर छोटा असेल तर मी हे काम कुठल्यातरी एकाद्या सीए कडे देईल किंवा माझा व्यवसाय वाढल्यानंतर माझ्या कंपनीमध्ये मी स्वतंत्र फायनान्स डिपार्टमेंट चालू करेल आणि योग्य व्यक्तीची त्यात नेमणूक करेल परंतु हे सर्व काम हे रन किपर सारखे आहे.
व्यवसायातील खेळाडू: आर्थिक साक्षरता ⛹️
व्यवसायातील खेळाडू जे प्रत्यक्ष फिल्ड वर असतात जसे कि प्रोडक्शन डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, पॆर्सोनेल डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट याना सर्वांना कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या आर्थिक साक्षरतेबद्दल माहिती असणे किंवा शिकणे हे फार महत्वाचे आहे. अंतिमतः कुठल्याही व्यवसायाचा उद्देश हा नफा मिळविणे हाच असतो आणि हे व्यवसायातील सर्व खेळाडू जर आर्थिक साक्षर असतील तरच ते कंपनीला नफा मिळवून देतील. आता आजचा विषय तरी आपण व्यवसाय मालकांच्या आर्थिक साक्षरतेपुरता मर्यादित ठेऊ या.
उद्योजकाला त्याची आर्थिक पत्रके वाचता आली पाहिजे आणि समजली पाहिजे. साधारणपणे नफा-तोटा पत्रकाला उजव्या बाजूला उत्पन्न आणि डाव्या बाजूला खर्च असतो आणि ताळेबंदाला डाव्या बाजूला देणी आणि उजव्या बाजूला मालमत्ता असतात. कुठलीही रक्कम खर्च झाली तरी ती एक तर नफातोटा पत्रकाला जाईल किंवा ताळेबंदाला जाईल.
अनेक उद्योजक स्वतःचे भाग भांडवल हे ताळेबंदाला देणे बाजूला का दाखवतात हेच माहीत नसते. जर माझाच व्यवसाय आहे आणि मी जर स्वतःचे भांडवल टाकले तर ते देणे कसे काय हा मोठा प्रश्न त्यांना पडतो परंतु अकाउंटिंग व अर्थशास्त्रात मध्ये तुमचा व्यवसाय आणि तुम्ही स्वतः हे वेगवेगळे मानले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचे भांडवल जरी व्यवसायात टाकले आणि ते ताळेबंदाचे देणे बाजूला असते कारण ते तुम्हाला म्हणजे त्या व्यवसायाच्या मालकाला देणे असते.
कॅपिटल कॉस्ट: व्यवस्थापन 💰
ताळेबंदात सर्वात महत्त्वाचा देणे बाजूचा विषयच असतो तो म्हणजे तुमच्या व्यवसायात असलेल्या कॅपिटल ची कॉस्ट. तुम्ही व्यवसायात आणलेले पैसे हे एक तर तुमचे स्वतःचे असतात (Equity) किंवा बँकेचे कर्ज (Debt) घेऊन तुम्ही व्यवसाय करत असता काही थोड्या काळासाठी तुमचे जे काही व्यावसायिक देणेदार आहे ज्याला आपण व्हेंडर म्हणतो त्यांचे देणे पण ताळेबंदला असते. ह्या प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी कॉस्ट आहे ती उद्योजकाला द्यावी लागते त्यालाच कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतात आणि तुमच्या व्यवसायाच्या नफ्यातून जर ही कॉस्ट ऑफ कॅपिटल वसूल होत नसेल तर ती फार चिंताजनक बाब आहे.
साधारणता बँकेचे कर्ज आणि वेंडरचे देणे याची जी काही कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ती सहज काढता येते म्हणजे जर तुम्ही कर्ज काढले असेल तर बँकेचे त्याचा जो काही व्याजदर असेल त्या व्याजदराणे येणारे व्याज म्हणजे तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल. तुम्हाला व्हेंडर चे देणे असेल तर विशिष्ट तारखेनंतर तुम्हाला त्याला जर काही पिनल इंटरेस्ट द्यायचे असेल तर ते पिनल इंटरेस्ट म्हणजे तुमचे व्हेंडर ची कॉस्ट ऑफ कॅपिटल.
परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक स्वतःचे जे भांडवल व्यवसायामध्ये लावतो ज्याला कॅपिटल (Equity) असे म्हणतात त्याची कॉस्ट कशी काढायची हे कुणालाही माहित नाही. पहिली गोष्ट त्याची कॉस्ट काढावी लागते आणि ती व्यवसायातून वसूल करावी लागते हे सुद्धा बऱ्याच उद्योजकांना माहिती नाही. तुम्ही व्यवसायात आणलेले भांडवल हे कुठून तरी आणलेले असते किंवा तुमच्याकडे जी शिल्लक रक्कम असते ती तुम्ही व्यवसायात गुंतवतात त्याला कॅपिटल असे म्हणतात.
परंतु हे कॅपिटल जर तुम्ही व्यवसायात ना गुंतवता जर दुसरीकडे गुंतवले असते समजा बँकेमध्ये एफ डी मध्ये ठेवले असते किंवा शेअर्समध्ये गुंतवले असते तर त्याला निश्चितच काहीतरी परतावा आला असता तो परतावा किती आला असता याचा अंदाज घेणे आणि ती तुमच्या कॅपिटल ची कॉस्ट पकडून ती सुद्धा तुमच्या व्यवसायाच्या नफ्यातून वसूल झाली पाहिजे या कडे उद्योजक कधी लक्षही देत नाही. उद्योजक फक्त त्याचे कॅपिटल व्यवसायात लावत नाही तर त्याचा वेळहि देत असतो २४ तास हा तो त्याच्या व्यवसायासाठी देत असतो.
मालमत्ता: परफॉर्मिंग विरूद्ध नॉन-परफॉर्मिंग 🏢
दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे जे भांडवल व्यवसायात गुंतलेले असतील त्याच्यासमोर तुमच्या मालमत्ता असतात त्या मालमत्ता सर्व ताळेबंदाच्या उजव्या बाजूला दिसतात. ह्या मालमत्ता मध्ये सुद्धा दोन विभाग तुम्हाला करावे लागतात एक म्हणजे परफॉर्मिंग मालमत्ता आणि दुसरी म्हणजे नॉन परफॉर्मिंग मालमत्ता. परफॉर्मिंग मालमत्ता म्हणजे जी तुम्हाला काहीतरी रेगुलर परतावा देते आणि नॉन परफॉर्मिंग मालमत्ता म्हणजे तुम्हाला ती काहीही परतावा देत नाही.
उद्योजकांसाठी चिंतेची बाब म्हणजे ताळेबंदाला दिसणाऱ्या 50% च्या वरती ज्या काही तुमच्या मालमत्ता आहे त्या नॉन परफॉर्मिंग मालमत्ता असतात. म्हणजे त्या तुम्हाला काही परतावा देत नाही. तुम्ही स्वतःच्या व्यवसायाचे ताळेबंद उघडून बघितलं की तुम्हाला कळेल की तुमच्या कुठल्या मालमत्ता परतावा देतात आणि कुठल्या परतावा देत नाही.
एक दोन उदाहरणाने हे समजून घेऊ तुम्ही गृह कर्ज घेतले असेल तर ते तुमच्या ताळेबंदाच्या डाव्या देणी बाजूला दिसेल व घर किंवा फ्लॅट हे ताळेबंदाला उजव्या बाजूला मालमत्ते मध्ये दिसेल. आता कर्ज घेऊन घर घेतले तर घर तुम्हाला काहीही परतावा देत नाही परंतु त्यासाठी घेतलेले कर्जाचे हफ्ते तुम्हाला दर महिन्याला भरावे लागतात. म्हणजे घर हि तुमची नॉन परफॉर्मिंग मालमत्ता झाली उलट त्यावर खर्च होत असतो जसे कि स्थानिक स्वराज्य संस्था कर ,दुरुस्ती मेंटेनन्स इ..
तसेच तुम्ही कर्ज घेऊन कार घेतली असेल तर कार सुद्धा तुमची नॉन फरफॉर्मिंग मालमत्ता झाली परंतु कार लोन चे हफ्ते तुम्हाला दर महिन्याला भरावाच लागतात . ताळेबंदाच्या देणे बाजूला जे काही तुमचे देणे आहे त्याला सतत व्याज चालू (कोस्ट ऑफ कॅपिटल) असते त्याला रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पण व्याजाला सुट्टी नसते.
परंतु तुमच्या व्यवसाय जर काही दिवस बंद असेल तर ताळेबंदाला ज्या काही मालमत्ता दिसतात त्या परतावा देणे थांबवतात त्यामुळे देण्याला कुठलीही सुट्टी नाही आणि तुमच्या प्रॉपर्टीला मात्र तुम्ही सुट्टी घेतली व्यवसाय बंद असेल तर ती उत्पन्न द्यायचे थांबून जाते. ह्या परफॉर्मिंग आणि नॉन फेरफॉर्मिंग मालमत्तांचा विचार करून तुमची कोस्ट ऑफ कॅपिटल काढली तर ती फार जास्त असते आणि ती व्यवसायाच्या नफ्यातून वसूल होणे हे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी फार म्हत्वाचे आहे.
तर उद्योजकाला सर्वात म्हत्वाची गोष्ट यायला पाहिजे ते म्हणजे स्वतःच्या व्यवसायाचे नफातोटा पत्रक आणि ताळेबंद वाचता येणे आणि चिंतेची बाब म्हणजे स्वतःला आर्थिक साक्षर म्हणून घेणाऱ्या उद्योजकांना सुद्धा त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल काढता येत नाही आणि परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग मालमत्ता ओळखता येत नाही . हे सर्व करून त्यानुसार निर्णय घेणे हेच उद्योजकाचे खरे काम असते. परफॉर्मिंग मालमत्ता ह्या सतत कश्या परतावा देतील व त्यासाठी त्यांचा वापर कसा करायचा हे उद्योजकाचे खरे कसब आहे .
ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.
