
💰 आयकर अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स): वेळेत भरा आणि व्याजापासून मुक्त व्हा! 🛡️
अजय एक प्रामाणिक करदाता, तो नेहमी त्याचे आयकर रिटर्न वेळेत भरतो. मागील वर्षी तो माझ्याकडे जुलैमध्ये आयकर रिटर्न भरण्यासाठी आला होता. त्याचे सर्व उत्पन्न पकडून त्याला साठ हजार आयकर भरायला येत होता आणि तेवढी रक्कम भरण्याच्या तयारीनिशी तो माझ्याकडे आला होता. परंतु त्याला त्या साठ हजार आयकरावर बारा हजार व्याज सुद्धा भरावे लागणार होते. त्याच म्हणणे असे होते की मी जर मुदतीत आयकर रिटर्न भरत असेल तर मी व्याज का भरू?
अजय सारखे अनेक आयकर दात्यांना हेच माहीत असते की आर्थिक वर्ष संपले की जुलै ते ऑक्टोबर पर्यंत ठरवून दिलेल्या तारखांच्या आत रिटर्न भरणे. परंतु ज्या त्या आर्थिक वर्षाचा आयकर हा त्या वर्षातच भरावा लागतो आणि तो नंतर भरला किंवा उशीर झाला तर त्यावर व्याज भरावे लागते.
सध्या सुरु असलेले आर्थिक वर्ष १ एप्रिल 2023 ला सुरू झालेले आहे व ते वर्ष हे 31 मार्च 2024 ला संपेल. ह्या वर्षासाठीचा जो काही आयकर तुम्हाला भरावयास येत असेल तो याच वर्षातच भरावा लागतो, त्यालाच ॲडव्हान्स टॅक्स असे म्हणतात. आर्थिक वर्ष चालू असताना त्यावर्षीच्या प्रत्यक्ष मिळालेल्या आणि वर्ष संपेपर्यंत मिळू शकणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज बांधून त्यावर एक देय असलेल्या आयकराचा अंदाज बांधून हा अग्रीम कर भरावा लागतो।
❓ ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय? 🧾
ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे चालू आर्थिक वर्षातच तुमच्या अंदाजित उत्पन्नावर भरलेला आयकर.
⚠️ ॲडव्हान्स कर भरणे कुणाला बंधनकारक आहे? 💼
जर करदात्यांचा कर हा वार्षिक दहा हजाराहून अधिक असेल तर आर्थिक वर्ष संपायच्या आधीच म्हणजेच १५ मार्चपर्यंत हा कर भरावा लागतो।
- अपवाद: आयकरानुसार जेष्ठ व्यक्ती (सिनिअर सिटीझन), ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे व त्यांना व्यवसायापासून उत्पन्न नसेल, तर त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे नाही.
📅 ॲडव्हान्स टॅक्स कधी भरायचा? 🗓️
आयकर कायद्यानुसार ॲडव्हान्स टॅक्स हा ४ हफ्त्यांमध्ये भरावा लागतो:
- १५ जून पर्यंत: १५%
- १५ सप्टेंबर पर्यंत: ४५%
- १५ डिसेंबर पर्यंत: ७५%
- १५ मार्च पर्यंत: १००%
व्यापारी आणि व्यावसायिक: जे व्यापारी आणि व्यावसायिक आपले उत्पन्न हिशोब न ठेवता आयकर कायद्यातील कलम 44 ए डी, 44 ए ई ह्या कलमाखाली भरतात, त्यांना कराने चार हप्त्याऐवजी एकच हप्त्यात अग्रीम कर भरण्याची मुभा दिलेली आहे आणि तो हप्ता त्यांना 15 मार्चपूर्वी भरणे गरजेचे आहे.
🧮 ॲडव्हान्स टॅक्स कसा काढायचा? 📊
ॲडव्हान्स टॅक्स काढताना तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न किती राहणार आहे याचा अंदाज करून कर काढायचा आहे. त्यासाठी तुमचे मागील वर्षी किती उत्पन्न होते व किती टॅक्स भरला होता याची सुद्धा मदत होते. असा कर काढताना तुमचा काही टी डी एस (TDS) कापलेला असेल तर तो वजा करावा लागतो।
- पहिले दोन हफ्ते (१५ जून आणि १५ सप्टेंबर) चा कर काढताना थोडे अंदाज चुकू शकतात कारण आपल्याकडे उत्पन्नाची माहिती नसते।
- नोकरदार वर्गाला अगोदरच माहिती असते की आपला पगार किती राहणार आहे त्यामुळे त्यांचा अंदाज चुकत नाही. नोकरदार वर्गाचा बराच कर हा मालक (employer) पगारातून कपात असतो म्हणून त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरायला येत नाही।
- नोकरदारांसाठी महत्वाचे: नोकरदार वर्गाला इतर काही उत्पन्न मिळत असेल जसे की बँक व्याज, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स डिव्हीडंड, शेती उत्पन्न, शेअर्स विक्री, भाडे इ. असेल तर त्यांना अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे।
- आयकर विभागाकडे तुमची माहिती आता अगोदरच पोहचलेली असते व ती माहिती तुमच्या आयकर पोर्टल वर लॉगिन करून बघायला मिळते, तिचा सुद्धा उपयोग ॲडव्हान्स टॅक्स काढण्यासाठी होत असतो।
💸 ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर व्याज भरावे लागते का? 🚫
उत्तर आहे: हो! आपण दिलेल्या स्लब तारखांना आयकर भरला नाही तर तुम्हाला व्याज सुद्धा भरावे लागते।
- आयकर कायदा कलम २३४ ब खाली १% व कलाम २३४ क खाली १% असे दर महिन्याला २% असे व्याज तुम्हाला भरावे लागेल।
- जरी आयकर रिटर्न भरण्याच्या तारखा ह्या वर्ष संपल्यानंतर जुलै पासून ऑक्टोबर पर्यंत असतील तरीही तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर तुम्हाला व्याज भरावे लागेल।
🆕 आर्थिक वर्ष २०२३-२०२४ पासून आयकराची नवीन स्कीम बंधनकारक: 🔄
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ पासून आयकर काढण्याची नवीन स्कीम हि आपोआप लागू होईल। तुम्हाला जर जुन्या स्कीम खाली आयकर भरावयाचा असेल तर ती तुम्हाला ती स्कीम निवडावी लागेल।
- पगारदार करदात्याला जुना स्कीम मधून नवीन स्कीम मध्ये दर वर्षी जी फायदेशीर आहे ती निवडण्याची मुभा आहे।
- इतर करदात्यांनी एकदा जुनी किंवा नवीन स्कीम निवडली तर ती बदल करण्याची त्यांना मुभा नाही. त्यामुळे पगारदार सोडून इतर करदात्यांच्या स्कीम निवडताना विशेष काळजी घेणे जरुरी आहे।
⚖️ जुन्या आणि नवीन स्कीम मध्ये फरक काय? ❓
एक महत्वाचे करदात्यांनी समजून घेणे जरुरी आहे की नवीन स्कीम मध्ये तुम्हाला कलम ८० अंतर्गत कुठल्याही वजावटी मिळणार नाही आणि नवीन स्कीम मध्ये ०% पासून ३०% पर्यंत सहा वेगवेगळ्या दराने व स्लॅब नुसार कर भरावा लागणार आहे. जुन्या स्कीम मध्ये ०% पासून ३०% पर्यंत चार वेगवेगळ्या दराने व स्लॅब नुसार टॅक्स भरावा लागेल।
- जुन्या स्कीम मध्ये कुठलीही वजावट न घेता उत्पन्न रु. ५ लाखाच्या खाली असेल तर टॅक्स लागणार नाही व नवीन स्कीम मध्ये रु. ७ लाखाच्या खाली असेल तर टॅक्स भरावा लागणार नाही।
- जुन्या स्कीम मध्ये जरी टॅक्स दर जास्त असेल तरीही तुम्हाला कलाम ८० च्या वजावटी मिळणार आहे. तसेच गृहकर्ज व्याज वजावट सुद्धा तुम्हाला जुन्या स्कीम खाली मिळणार आहे कि जी नवीन स्कीम खाली उपलब्ध नाही।
कोणती स्कीम चांगली? कोणती स्कीम चांगली म्हणजे कमी आयकर येईल याचे उत्तर मोघम देणे कठीण आहे. प्रत्येकाचे टॅक्स सेव्हिंग गुंतवणुकी किती आहे ह्यानुसार उत्तर बदलत जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी दोन्ही स्कीम ने टॅक्स काढून मगच ठरवावे लागेल कि कुठली स्कीम योग्य आहे।
🔥 आजच्या लेखाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स तुम्हाला १५ मार्च 2025 पूर्वीच भरणे गरजेचे आहे, नाही तर महिन्याला महिन्याला २% व्याज भरण्याची तयारी ठेवावी लागेल! 🎯
ब्लॉग लेखन: सी ए राम डावरे
मोबाईल नंबर: ९०४९७८६३३३
