आर्थिक फसवणूक आणि डनिंग क्रुगर इफेक्ट्स.

आर्थिक फसवणूक आणि डनिंग क्रुगर इफेक्ट्स

रोजच्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर येणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या बातम्या जवळपास एकाच पॅटर्नच्या असतात तरी लोक फसतात असे का? याचा विचार केला असता अर्थसाक्षरतेचा अभाव हेच कारण लक्षात येते. कळते पण वळत नाही किंवा कळत पण नाही आणि त्यामुळे समजायचा वगैरे संबंध नाही किंवा आपल्या गैरसमजांना कुरवाळत व आपण आर्थिक क्षेत्रात खूप तज्ज्ञ किंवा हुशार आहोत असे मानतो. भारतात गेल्या काही वर्षात पोन्झी स्कीम मध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपये चा गैरव्यवहार झाला आहे. यात पैसे बुडाले ते सर्वसामान्य लोकांचे. अति लाभाचा हव्यास हे मुख्य कारण आहे.

डनिंग क्रूगर इफेक्ट आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन

अमेरीकेत मानसशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापक डेव्हिड डनिंग यांनी एक शोध निबंध प्रकाशित केला जो पुढे डनिंग क्रूगर इफेक्ट म्हणून प्रसिद्ध झाला. प्राध्यापक डनिंग यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अनेक मानसशास्त्रीय प्रयोग केले. व्याकरण, विनोद, तर्कशास्त्र या विषयांवर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही किती गुण मिळवाल याचा विद्यार्थ्यांना अंदाज बांधायला सांगितले असता ज्यांना सर्वात कमी गुण मिळाले त्यांना ते सर्वात जास्त गुण प्राप्त करतील असे वाटत होते आणि याउलट ज्यांना खरोखरच उत्कृष्ट गुण मिळाले त्यांना मात्र तसा आत्मविश्वास नव्हता.

आर्थिक क्षेत्रात डनिंग क्रूगर इफेक्ट

आर्थिक जीवनात सुद्धा हा डनिंग क्रूगर इफेक्ट कसा परिणाम करतो हे आपण बघूया. बरेच जण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यात पुढे अच्छे दिन येणार आहे, माझ्या कंपनीबरोबरच माझी आपोआप प्रगती होईल आणि पगारवाढ मिळेल म्हणून कुठलाही खर्च करण्यास मागेपुढे बघत नाहीत. परंतु वास्तूस्थिती अशी असते की एखाद्या क्षेत्रात जास्त फायदा मिळाल्यास अनेक लोक त्यात नव्याने दाखल होतात. स्पर्धा वाढते आणि नफा कमी होतो. उत्पन्न कितीही असो, बचतीची सवय सुरुवातीलाच लावावी लागते. प्रत्यक्ष हातात पैसे आल्याशिवाय त्यांची दिवास्वप्ने टाळावीत.

बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व

बराच वेळेस निवृत्ती नियोजन करताना निवृत्ती निधी साठवायची गरज मला नाही कारण माझी मुले पुढे नक्कीच माझी काळजी घेतील असा विश्वास असतो. परंतु वाढती महागाई आणि वयानुसार वाढणाऱ्या खर्चाची तरतूद प्रत्येकाने उत्पन्न सुरू असतानाच करायला हवी. मुलांवर आर्थिक बोजा होणे टाळले पाहिजे. आत्मनिर्भर स्वाभिमानी निवृत्तीसाठी अधिक पैसे वाचवून प्रयत्नपूर्वक निवृत्ती निधी तयार करणे आवश्यक आहे.

शेअर मार्केट मधील गुंतवणूक

काहीजण असा आत्मविश्वास बाळगतात की युट्युबवर पाहिलेला व्हिडिओ बघून शेअर मार्केट मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करून भरपूर कमाई करता येईल. परंतु खरी वस्तुस्थिती अशी आहे की वारेन बफेट गेली आठ दशके शेअर मार्केटचे विद्यार्थी आहेत आणि ते दीर्घकाळ तपश्चर्यसारखा अभ्यास करतात. इंट्राडे ट्रेडिंग करून सातत्याने उत्पन्न मिळवणारी उदाहरणे खूप थोडी आहेत. शेअर मार्केट मधील गुंतवणूक करण्याआधी तुमची आर्थिक परिस्थिती तपासा. पुरेसा आणीबाणी निधी आणि विमा असल्यावरच शेअर मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात करा. अभ्यास न करता शेअर मार्केट मधली गुंतवणूक एक होऊ घातलेला आर्थिक अपघात असतो.

कर्ज व्यवस्थापन आणि खर्च

माझे उत्पन्न वाढतच राहणार आहे म्हणून मी घर, गाडी, घरातील वस्तू, फर्निचर, परदेशी सहली यासाठी नेहमी कर्ज काढतो हा एक मोठा गैरसमज आहे. उत्पन्न वाढेलच याची खात्री नसते पण कर्जाचे हप्ते नक्कीच भरावे लागतात. कर्ज घेताना सर्व बाजूंनी विचार करावा आणि उत्पन्नात चढ-उतार आले तरी माझा कर्ज परतफेडीवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.

आर्थिक साक्षरता आणि डनिंग क्रूगर इफेक्ट

आर्थिक साक्षरतेमध्ये डनिंग क्रूगर इफेक्ट असं सांगतो की आपण आपल्या स्वतःच्या ज्ञानावर अवास्तव अवलंबून असतो आणि आपण आर्थिक साक्षरतेबद्दल पुस्तके वाचत नाही किंवा तज्ञांचा सल्ला घेत नाही. आपली आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचे ध्येय ठरवणे हे महत्त्वाचे आहे.

आर्थिक साक्षरता कशी वाढवावी

अर्थसाक्षरता म्हणजे सतत सुरू असणारा सुंदर प्रवास आहे. यामध्ये काही सोपी कौशल्य आत्मसात केली तर तुम्हीही लवकर अर्थ संपन्न होऊ शकता. उत्पन्न व खर्च याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. तुमच्या बचतीच्या सवयीपेक्षा तुमच्या खर्च करण्याच्या सवयीच तुम्हाला लवकर अर्थ संपन्न बनवत असतात. आर्थिक ध्येय ठरवणे, बजेट तयार करणे, बचतीचे महत्त्व समजून घेणे, कर्ज व्यवस्थापन समजून घेणे, विम्याची आवश्यकता समजून घेणे, योग्य गुंतवणूक करणे आणि फसवणुकीपासून स्वतःची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष

शाळा आणि कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरतेबद्दल अजिबात गांभीर्याने शिकवले जात नाही. घरी या विषयावर मोकळी चर्चा होत नाही. पैशाविषयी वडीलधाऱ्यांचे गैरसमज ज्ञान म्हणून दिले जातात. तज्ञांनी लिहिलेल्या चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करण्याची गरज आहे. युट्युबवरील चांगले व्हिडिओज बघावेत, माहितीपर वेबसाईटला भेटी द्याव्यात, व्याख्याने आणि कार्यशाळांद्वारे ज्ञान सतत वृद्धिंगत करावे. स्वतःच्या चुका शिकण्याची प्रक्रिया आहे आणि आर्थिक नियोजन हा विषय तज्ञांकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर आणखी स्पष्ट होतो.

आर्थिक शिस्त पाळली तर तुम्हीही अर्थ संपन्न होऊ शकता. फक्त चुकीचे गैरसमज कुरवाळून बसल्यामुळे आणि आर्थिक नियोजन आपण खूप हुशार आहोत हा अति आत्मविश्वास आपले नुकसानच करून जातो. हाच तो डनिंग क्रूगर इफेक्ट आणि त्यामुळे लाखो रुपये बुडतात ते सर्वसामान्य उत्पन्न गटातील लोकांचे.

Blog by : CA Ram Daware

Mob No. 9049786333.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *