महिलांचे आर्थिक स्वावलंबन हीच खरी दुर्गा पूजा .

दुर्गांचे आर्थिक स्वावलंबन: एक चिंतन

नुकताच मी एका कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरता ह्या विषयावर बोलत होतो. त्या कार्यक्रमात सिनियर कॉलेजच्या बऱ्याच मुलीसुद्धा उपस्थित होत्या. त्यात मी एक प्रश्न विचारला कि ‘क्लॉडिया गोल्डिन’ हे नाव कुणी कुणी ऐकलेले आहे का? कुणीही हात वर केला नाही. आता हा लेख तुम्ही वाचत आहात, तर लेख वाचणे बंद करून हे नाव आठवावे आणि ह्या नावाची महिला कोण आहे हे गुगलवर न शोधता सांगावे.

आपल्याकडे नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दुर्गापूजा तर ह्या उत्सवाचा महत्त्वाचा भाग. आपल्या घरात, आजूबाजूलासुद्धा दुर्गा असतात, त्यांना आर्थिक स्वावलंबन उपलब्ध आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आवश्यक आहे.

काही प्रातिनिधिक दुर्गा आणि त्यांचे आर्थिक वास्तव

समाजात अशा अनेक दुर्गा आहेत ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्यांची काही उदाहरणे पाहूया:

  • दुर्गा नंबर १ : आशाताई 👵
    • वय वर्ष ६५, पतीचे नुकतेच कोरोनामध्ये निधन.
    • एक मुलगी परदेशात, मुलगा-सुनबाई दुबईला नोकरीला.
    • पती बस कंडक्टर होते, निवृत्तीनंतरची शिल्लक रक्कम उपचारात संपली.
    • आता रु. ३०००/- फॅमिली पेंशनवर औषधोपचार खर्च भागतो, मुलगा पैसे पाठवतो पण ते अनिश्चित असतात.
    • संपूर्ण आयुष्य पतीकडे आणि आता मुलाकडे पैशांसाठी अवलंबून.
  • दुर्गा नंबर २ : निर्मलाताई 👩
    • वय वर्ष ३५, पती नोकरी करतात, एक मुलगी शिकतेय.
    • निर्मलाताई घरी शिलाई काम करून थोडंफार कमवतात, पतीचा पगार जेमतेम.
    • घरातील खर्चासाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात.
    • एका अपघातात जखमी झाल्यावर आई-वडिलांनी मदत केली.
  • दुर्गा नंबर ३ : कल्पनाताई 👩‍🌾
    • वय वर्ष ५०, पती-पत्नी दोघेही शेती करतात.
    • शेतीतून कुटुंबाचे पोट भरेल एवढेच उत्पन्न, शेतमालाच्या भावाची शाश्वती नाही.
    • मैत्रिणीसोबत चारधाम यात्रेला जायचे आहे, पण पतीकडे पैसे नसल्याने नकार.
    • मुलगा शिकला पण नोकरी नाही.
  • दुर्गा नंबर ४ : मनीषाताई 🏠
    • वय वर्ष ४०, विदर्भातील खेड्यातून शहरात आलेली.
    • पती बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे मजूर, दोघे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात.
    • मनीषाताई घरकाम करते, दिवसाला रु १५०० मिळतात, पण सर्व पैसे पती घेतो, जो दारू पितो.
    • दोन मुले महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात.
    • बँकेत खाते नाही, आजारी पडल्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, दारूच्या व्यसनामुळे पैसे शिल्लक नाहीत.

वरील काही प्रातिनिधिक दुर्गा हे आपल्या समाज्यातील महिलांचे प्रतिनिधित्व करतात. लहानपणी आई-वडिलांकडे, लग्नानंतर नवऱ्याकडे आणि म्हातारपणी मुलांकडे पैसे मागायची वेळ येते. फार कमी कुटुंबांमध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष दिले जाते.

आशादायी चित्र आणि आव्हाने

आता काही दुर्गा स्वावलंबी झाल्या आहेत, स्वतः पैसे कमावतात, खर्च करतात, बचत करतात आणि गुंतवणूक पण करतात. परंतु हे प्रमाण फार कमी आहे, एका सर्वेनुसार जेमतेम ५%. 2001 मध्ये महिलांचा नोकरीमधील सहभाग १२% होता, तो 2024 मध्ये ३७% पर्यंत पोहोचला आहे. 2030 पर्यंत तो ५०% होण्याचा अंदाज आहे. म्हणजे 2030 नंतरही ५०% महिला ह्या आर्थिक स्वावलंबी होणार नाहीत, त्यांना कुणावर तरी अवलंबून राहावे लागेल. विशेष काळजीचा विषय म्हणजे महिलांना नोकरीत मिळणारे उत्पन्न अजूनही पुरुषांपेक्षा कमी आहे.

क्लॉडिया गोल्डिन आणि महिलांचे आर्थिक स्वावलंबन

अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याने दरवर्षीचे अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक कुठल्या संशोधनाला जाते यावरती मी लक्ष ठेवून असतो. 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना मिळाला. त्यांना हा पुरस्कार महिलांच्या श्रम बाजारातील सहभागावर केलेल्या संशोधनासाठी देण्यात आला आहे. गोल्डिन यांनी महिलांच्या कामाच्या इतिहासावर सखोल संशोधन केले आहे आणि लिंग असमतोल व वेतनातील फरक यामागील घटक उघड केले आहेत. त्यांच्या संशोधनामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातील आव्हानांचा आणि त्यावरील उपायांचा अभ्यास अधिक स्पष्टपणे करता येतो. ज्या महिला नोकरी करत नाही, ज्या गृहिणी आहे किंवा शेतमजूर, व घरकाम करणाऱ्या महिला आहे, त्यांचे आर्थिक स्वावलंबन फार काजळीचा विषय आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला स्वावलंबी बनविणे हे सर्वांसमोरील एक मोठे आव्हान आहे. केवळ लाडकी बहीण योजना आणून ह्या महिला आर्थिक स्वावलंबी होणार नाही. ज्या अर्थी महिलांचे आर्थिक स्वावलंबन या विषयाला अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक मिळते म्हणजे हा विषय जागतिक विषयच म्हणावा लागेल आणि त्याची गंभीरता पण तेवढीच.

आव्हाने आणि उपाय

महिलांचे आर्थिक स्वावलंबन म्हणजे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे आणि आपल्या जीवनाच्या निर्णयांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून आत्मनिर्भर असणे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध आव्हाने आहेत आणि त्यावर काही उपाय सुद्धा आहेत:

  • आव्हाने:
    1. शिक्षणाचा अभाव 📚: अनेक महिलांना शिक्षणाची संधी कमी मिळते, विशेषतः ग्रामीण भागात. यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होत नाही आणि त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळत नाहीत. आदिवासी मुलीचे शिक्षण फार तर १० वी पर्यंत होते, त्यानंतर लगेच लग्न होते आणि मग संसार चक्रात अडकले की शिक्षण थांबून जाते.
    2. सांस्कृतिक आणि सामाजिक बंधने 🔗: काही ठिकाणी महिलांवर पारंपरिक आणि रूढीवादी विचारांचे बंधन असते, ज्यामुळे त्यांना घराबाहेर काम करण्याची किंवा स्वतःच्या व्यवसायाच्या संधी मिळत नाहीत. यात आता बरच बदल झाला आहे परंतु अजूनही यात मोठी सुधारणा आवश्यक आहे.
    3. आर्थिक साधनांचा अभाव 💰: बँकिंग सेवा, कर्ज सुविधा किंवा इतर आर्थिक साधनांवर महिलांची मर्यादित पोहोच असते. त्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या प्रगती साधण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. बरच वेळेस अनेक व्यवसाय उद्योग महिलांचे नावाने असतात परंतु सर्व हक्क पुरुषांकडे असतात.
    4. समान वेतनाचा अभाव ⚖️: अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन मिळते, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात अडचण येते.गोल्डिन यांचे संशोधन मुख्यत: पुरुष आणि महिलांच्या वेतनातील तफावत आणि या तफावतीमागील ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांवर आधारित आहे. त्यांनी दाखवून दिले की, पुरुष आणि महिलांच्या वेतनात असलेला फरक केवळ भेदभावामुळे नसून, करिअरची निवड, कुटुंबाची जबाबदारी, वेळेची लवचिकता या घटकांमुळेही आहे.
    5. कौटुंबिक जबाबदाऱ्या 👪: महिलांना घरातील जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, ज्यामुळे त्यांना कामासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळत नाही. साधारणपणे मुलं झाली की ती सांभाळणे हि जबाबदारी महिलांकडे जाते.
    6. सुरक्षा आणि प्रवासाच्या अडचणी 🚷: महिलांना अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तव किंवा प्रवासाच्या समस्यांमुळे कामावर जाण्यास अडचणी येतात.
  • उपाय:
    1. शिक्षणाची संधी वाढवणे 🎓: महिलांसाठी शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्यांच्या प्रशिक्षणांची व्यवस्था करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांचे कौशल्यवर्धन होईल आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळतील.गोल्डिन यांनी स्त्रियांच्या शिक्षणाच्या स्तरावर आणि त्याच्या परिणामांवरही संशोधन केले आहे. त्यांनी दाखवले की, शिक्षणातील वाढीमुळे महिलांना करिअरच्या उच्च स्तरांवर पोहोचण्याची संधी मिळते, परंतु तरीही काही अडथळे अस्तित्वात आहेत, जसे की पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे करिअरमध्ये खंड पडणे.
    2. समाजमानसिकता बदलणे 🧠: महिलांच्या आर्थिक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी समाजात जागरुकता निर्माण करणे आणि महिलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आजही सर्व आर्थिक व्यवहार पुरुषांकडे आहे. आर्थिक गुंतवणुका सुद्धा कुटुंबातील पुरुषांच्याच नावावर असतात त्यात महिलांचा सहभाग वाढविणे .कुटूंबातील पुरुष आणि महिला याचे नावावर समान गुंतवणूक करणे हे उपाय उपलब्ध आहे.
    3. आर्थिक योजना आणि कर्ज सुविधा 🏦: महिलांसाठी विशेष आर्थिक योजना, सूक्ष्म वित्तपुरवठा, आणि अनुदान सुविधा सुरू आहे परंतु ह्यात घरातील पुरुषानाच निर्णय घेण्याचे अधिकार असतात व अर्थ निर्णय पुरुष च घेतात. यात बदल होणे गरजेचे आहे ज्यामुळे त्यांना स्वतःच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळू शकेल.
    4. समान वेतनाचे कायदे 📜: महिलांसाठी समान वेतनाचा हक्क संरक्षित करणारे कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे कि जी फारशी परिणामकारक होत नाही. अनेक कायदे हे कागदावर आहे, काही महिलांना सुद्धा ह्या कायद्याबद्दल माहिती नसते.
    5. कौटुंबिक समर्थन ❤️: घरातील जबाबदाऱ्या वाटून घेण्यास प्रोत्साहन देणे, ज्यामुळे महिलांना बाहेरील कामासाठी वेळ मिळेल. अनेक कुटुंबात महिला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असते.
    6. महिला उद्योजकता प्रोत्साहन 👩‍💼: महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, आणि मार्केटमध्ये महिलांच्या उत्पादनांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आवश्यक आहे. यातसुद्धा आता महिलांचा सहभाग वाढत आहे परंतु अजूनही यात आर्थिक निर्णय पुरुषच घेत असतात.
    7. सुरक्षा उपाय आणि सोयीसुविधा 🛡️: महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यक्षेत्रात योग्य धोरणे आणि सुविधा उपलब्ध करणे, तसेच त्यांना सुरक्षित प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. आज महिलांवरील होणारे अत्याचार बघता हे फार महत्वाचे आहे. जेव्हा महिनाला सुरक्षित वाटेल तेव्हा त्या बाहेर पडतील.

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हे त्यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक आहे, आणि यासाठी सरकार, समाज, आणि कुटुंबांनी मिळून काम करण्याची गरज आहे. फक्त दुर्गाशक्तीची पूजा करून उपयोग नाही आपल्या आजूबाजूच्या दुर्गाना आर्थिक स्वावलंबी करणे हे विकसित भारताचे उद्धिष्ट असावे.

ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *