अनिश्चित उत्पन्नाचे नियोजन

अनिश्चित उत्पन्न आणि त्याचे नियोजन: आर्थिक आव्हान आणि उपाय

निशा आणि अजय हे दोघेही नोकरी करत होते. कोरोनामध्ये त्यांची नोकरी गेली. घरातील जवळच्या व्यक्तीसुद्धा कोरोनाला बळी पडल्या आणि देवाघरी गेल्या. कोरोना पूर्वी नोकरी होती, दोघांनाही खूप चांगला नाही परंतु बऱ्यापैकी पगार येत होता. येणारा पगार चांगला असल्यामुळे त्यांनी एक छोटेसे घर घेतले होते आणि त्या घराच्या गृह कर्जाचा हप्ता पगारातून जात होता व उरल्या सुरल्या पैशातून घरातील इतर खर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च असे चालू होते. थोडीफार बचतही त्यांच्याकडे होती परंतु कोरोनामुळे घरातील व्यक्तींच्या दवाखान्याच्या खर्चामध्ये सर्व बचतही संपून गेली.

दोन वर्ष कोरोनामध्ये काही उत्पन्न नव्हते त्यानंतर काय करायचे तर त्यांनी एक व्यवसाय सुरू केला तो व्यवसाय होता घरातच मसाल्याचे पदार्थ तयार करणे आणि त्याची विक्री करणे. व्यवसाय सुरू झाल्यानंतर थोडेफार उत्पन्न मिळायला लागले परंतु काही काही महिन्यांमध्ये खूप विक्री व्हायची तर काही महिन्यांमध्ये फार कमी विक्री व्हायची आणि उत्पादन खर्च पण निघायचा नाही. नोकरी होती तेव्हा निश्चित उत्पन्न होते परंतु व्यवसाय सुरू केल्यानंतर उत्पन्नामध्ये अनियमितता आली. घर कर्जाचे हफ्ते, मुलांच्या शाळेची फी सुद्धा भरण्यात अनिश्चितता आली. उत्पन्नामध्ये अनियमितपना आल्यानंतर सर्वच गणित बिघडून जाते आणि मग स्ट्रेस, आजारपण ह्या गोष्टी मागे लागतातच. कोरोना नंतर नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसाय सुरु केल्यानंतर उत्पन्न अनिश्चितता हि गंभीर समस्या अनेक छोट्या उद्योजकांसमोर आहे.

अजय आणि निशा हे दोघेच नाही परंतु आपल्या समाजात असे खूप लोक आहे की त्यांचे व्यवसाय आहे परंतु उत्पन्नामध्ये अनिश्चितता आहे अशा अनिश्चित उत्पन्नामध्ये आपल्या आर्थिक बाबींचे नियोजन कसं करायचं याबाबतीत आपण ह्या लेखांमध्ये विचार करणार आहोत.

अनिश्चित उत्पन्न असेल तर आपल्या उत्पन्नाचे व खर्चाचे नियोजन आपण कसे करू शकतो याबद्दल आपण विचार करू.

1. उत्पन्न व खर्चाचे बजेट तयार करा 📝

एका सर्वेमध्ये असे लक्षात आले आहे की भारतातील फक्त ५% कुटुंब हे आपल्या उत्पन्नाचे व खर्चाचे बजेट तयार करतात. आपल्या मराठी माणसांमध्ये बजेटवर फार लोक कमी लक्ष देतात किंवा असे काही करणे गरजेचे आहे हे त्यांच्या ध्यानी मणी सुद्धा नसते. वर्षाच्या सुरुवातीला आपल्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे बजेट तयार केले तर आलेले उत्पन्न नक्की कुठे खर्च होईल हे आपल्याला अगोदरच लक्षात येते. आपल्याकडे वर्ष सुरू होण्याआधी कुणीही आपल्या घर खर्चाचे किंवा होणाऱ्या कुठल्याही खर्चाचे बजेट तयार करत नाही आणि असे न केल्यामुळे येणारे पैसे कसे येणार आहे कुठे जाणार आहे याचा कुठलाही ताळमेळ नसतो. त्यामुळे वर्ष सुरू व्हायच्या आधी मग ते वर्ष आर्थिक वर्ष असो किंवा आपले मराठी वर्ष असो ते सुरू व्हायच्या आधी आपल्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे बजेट तयार करणे आवश्यक आहे आणि असे बजेट तयार केल्यानंतर त्या बजेटच्या बाहेर खर्च जाणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. कोरोना मधेच एका ऑनलाईन सेमिनार मध्ये ह्या बजेट विषयी मी दोन तास मार्गदर्शन केले होते आणि नंतर बजेट तयार कसे करायचे यावरही मार्गदर्शन केले होते आणि आजही काही लोक मला सांगतात कि आम्ही दर दिवाळीला सर्व कुटुंब एकत्र बसून आमच्या उत्प्प्नन आणि खर्चाचे बजेट तयार करतो. आणि बजेट च्या बाहेर खर्च जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो.

असे बजेट तयार करताना काही न टाळता येणारे खर्च असतात व ते नियमित करावे लागतात त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

2. जेव्हा उत्पन्न जास्त मिळेल तेव्हा बचत करा 💰

अनिश्चित उत्पन्नाच्या काळामध्ये कधी उत्पन्न जास्त मिळते तर कधी कमी मिळते. परंतु ज्या महिन्यांमध्ये जास्त उत्पन्न मिळेल त्या महिन्यामध्ये आपण त्याची बचत करणे आवश्यक आहे. अशी बचत ही पुढील काळात कमी उत्पन्न आले तर त्यासाठी उपयोगात आणली जाते. प्रामुख्याने जेव्हा जास्त उत्पन्न येते तेव्हा आपण खर्चही जास्त करतो याला आर्थिक विषयात पार्किसन्स चा नियम म्हणतात. हा नियम सांगतो कि लोकांना जास्त उत्पन्न आले कि लोक खर्चही जास्त करतात. परंतु आपण खर्चाचे बजेट अगोदरच ठरविल्यामुळे त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो

3. पर्यायी उत्पन्नाचा मार्गांचा विचार करा 💡

अनिश्चित उत्पन्नाच्या काळामध्ये घरामधील सदस्यांनी कुठल्यातरी एकाच बिजनेस मध्ये न राहता, काही घरातील सदस्यांनी दुसऱ्या व्यवसायाकडे वळून पर्यायी मार्गाचा उत्पन्न तयार करावे म्हणजे एखाद्या बिजनेस मध्ये जर अनिश्चित उत्पन्न असेल तर त्याची भरपाई दुसऱ्या सोर्स मधून करता येईल. पर्यायी उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या घरात किती सदस्य आहे आणि ते काय करू शकतात यावर हे सर्व अवलंबून आहे.

4. व्यवसायासाठी मिळणाऱ्या कॅश क्रेडिट कर्जाचा विचार करा 🏦

अनिश्चित उत्पन्नाच्या काळात बँकांकडून आपण कॅश क्रेडिट कर्ज सुद्धा घेऊ शकतो म्हणजे हे कर्ज जसे व्यवसायासाठी लागेल तसे वापरता येते आणि वापरलेल्या रकमेवरच तुम्हाला व्याज भरावे लागते ज्या काळामध्ये उत्पन्न कमी येईल त्या काळामध्ये या कर्जातून तुम्हाला पैसे वापरता येतील आणि जेव्हा उत्पन्न जास्त येईल तेव्हा ते कर्ज तुम्हाला भरता येईल.अनिश्चित उत्पन्नाच्या काळासाठी किंवा गरजेसाठी कॅश क्रेडिट कर्ज हे फार चांगला पर्याय आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर बँकेशी व्यवस्थित संबंध तयार करून असे कॅश क्रेडिट कर्जाचे लिमिट मंजूर करून घ्यायला हवे.

5. इमर्जन्सी फंड तयार करा 🆘

जेव्हा आपल्याला जास्त उत्पन्न असते तेव्हा त्या उत्पन्नातील काही भाग आपण इमर्जन्सी फंडामध्ये बाजूला ठेवायला पाहिजे यामध्ये काही अनिश्चित घटना घडल्या तर त्यासाठी हा फंड उपयोगी होऊ शकत. ह्या फंडाची गुंतवणूक हि शक्यतो इमर्जनशी मध्ये लवकर उपलब्ध होईल याठिकाणीच गुंतवणूक करावी.

6. पुरेसा विमा घ्या 🛡️

इन्शुरन्स ही आता काही फॅशन राहीलेली आताही अन्न वस्त्र निवारा यासारखी आता ती गरजेची वस्तू झाली आहे. अपघात विमा किंवा आयुर्विमा याला आता पर्याय नाही अनिश्चित काळासाठी किंवा काही दुर्घटना घडली तर विम्याचे कवच हा फार मोठा मदतीचा हात असतो आपल्यावरती किती कर्ज आहे त्यासाठी विम्याचे कव्हर किती आहे हे सुद्धा बघणे गरजेचे आहे.

7. व्यवसायातील उत्पन्न रेगुलर कसे येईल याकडे लक्ष द्या 📈

कुठलाही व्यवसाय सुरु करतेवेळी एक बाब विशेष करून लक्षात घ्याला हवी कि आपल्या व्यवसायातील उत्पन्न हे कुठल्या मार्गाने आणि कधी येणार आहे. दर महिन्याला काही विशिष्ट उत्पन्न हे मासिक फी, त्रैमासिक फी किंवा सहामाही फी असे आले तर त्याचे नियोजन करणे सुद्धा सोपे जाते. जसे कि जिम व्यवसायात वार्षिक, सहामाही, तिमाही आणि दर महिन्याला असे फी चे पर्याय उपलब्ध असतात. तुमच्या व्यवसायात सुद्धा तुम्हाला असा ग्राहक वर्ग तयार करावा लागेल जो नियमित पैसे देईल.

8. मासिक उत्पन्नाच्या स्कीम मध्ये काही पैसे टाका 🗓️

जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवे असेल तर मासिक उत्पन्नच्या अनेक स्कीम बँक किंवा म्युचल फंडामध्ये उपलब्ध आहे त्यात एक ठराविक रक्कम गुंतविल्यानंतर मासिक उत्प्प्पन मिळू शकते.

9. खर्चावर नियंत्रण 🚫

अनिश्चित उत्पन्नाच्या काळात खर्चावर नियंत्रण हि बाब फार काटेकोरपणे पाळावी लागते. खर्च करताना तो खर्च गरज आहे कि इच्छा आहे याचा नेहमी विचार करा. खर्च करताना नेहमी दोन प्रश्न विचारले कि तो खर्च गरजेवर आहे कि इच्छेवर आहे हे लगेच लक्षात येते. पहिला प्रश्न तुम्ही जो खर्च करणार आहे त्याशिवाय मी जगू शकतो का? व दुसरा प्रश्न होणाऱ्या खर्चाशिवाय मी काम करू शकतो का? ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ती तुमची इच्छा आहे. अनिश्चित उत्पन्नाच्या काळात फक्त गरजेवर खर्च करा इच्छेवर नाही.

10. तुम्हाला समजतील असेच व्यवसाय करा किंवा समजतील अश्याच ठिकाणी गुंतवणूक करा 🤔

जगप्रसिद्ध गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांना एका मुलाखती मध्ये प्रश्न विचारला कि तुमचे गुंतवणूक सल्ले किंवा नियम हे समजायला आणि अमलात आणायला खूप सोप्या असतात तरी लोक त्या का अमलात आणत नाही. त्यांनी दिलेले उत्तर होते कि लोकांना श्रीमंत व्हायची खूप घाई झालेली असते. आज रोजच्या वर्तमान पत्रात एक तरी आर्थिक फसवणुकीची बातमी असतेच. शेअर मार्केट मध्ये अती परताव्याचा अमिषाला लोक बळी पडतात, महिन्याला अति व्याजदर मिळेल ह्या आशेने लोक लाखो रुपये गुंतवतात व फसतात. यामागे एकाच गोष्ट आहे ती म्हणजे अतीलोभ आणि झटपट श्रीमंत होणे. जे व्यवसाय व ज्या गुंतवणुकी तुम्हला कळत किंवा समजत नसतील त्यामागे लागू नका.

ब्लॉग लेखन : सी ए राम डावरे , मोबाईल : ९०४९७८६३३३.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *