
आर्थिक ध्येय कसे गाठायचं: कळतं पण वळत नाही! 🎯
अमित खूप गोंधळलेला होता. त्याने आर्थिक विषयाची खूप सारे सेमिनार, वेबिनार केलेले होते, युट्युब वरती अनेक व्हिडिओ बघितले होते, परंतु आर्थिक ध्येय पूर्ण कसे करायचे याबाबत तो अतिशय गोंधळला होता. अजित मला सांगतो की मला सर्व माहिती आहे की अर्थ संपन्न कसे व्हायचे आणि आपली आर्थिक ध्येय कसे पूर्ण करायचे. मी याबाबत खूप सारी माहिती घेतलेली आहे परंतु नक्की पुढे कसे जायचे हे मला कळत नाही.
संजय गेल्या २० वर्षांपासून व्यवसाय करत आहे व त्यातून महिन्याला २ लाख रुपये कमवत आहे. परंतु तो सुद्धा म्हणतो कि माझी बचत आणि गुंतवणूक काही साठली नाही पैसे कुठं जातात हे सुद्धा समजत नाही आणि आज २० वर्षानंतर सुद्धा माझे आर्थिक धेय्य गाठता आले नाही.
सुरेश आणि वैशाली दोघेही नोकरी करतात त्यांना दोन मुलं आहे ते नेहमी आपल्या आर्थिक भविष्याचा विचार करतात परंतु ते आर्थिक धेय्य मिळविण्यासाठी नक्की सुरवात कशी करायची हे समजत नाही.
आपल्या बहुतेक जणांचे असंच होतं आहे की आपण खूप सारी माहिती वाचतो, ब्लॉग वाचतो, आर्थिक विषयाचे वेगवेगळे कोर्सेस करतो, युट्युब वर वेगवेगळे व्हिडिओ बघतो, मित्रांमध्ये या संबंधी चर्चा घडवून आणतो परंतु याबाबतीत नक्की पुढे कसे जायचे हे काही समजत नाही. आणि अनेक वर्ष पैसे कमवून सुद्धा गाडी जैसे थे असते. यालाच कळतं पण वळत नाही असे म्हणतात.
तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय गाठायचे असतील तर त्यासाठी एक पद्धत अवलंब करावी लागते त्याबाबत आपण आज या लेखात विचार करू:
आर्थिक ध्येय गाठण्यासाठी ५ पायऱ्या 🪜
- आपण नक्की कुठे आहोत, हे जाणून घ्या! 📍आपण जेव्हा आर्थिक ध्येय ठरवितो तेव्हा आपल्याला आपण नक्की कुठे आहे याबद्दल माहिती किंवा डाटा जमा करावा लागतो. अनेक लोकांची नेमकी इथंच गडबड होत असते. मी आर्थिक बाबतीत खूप हुशार आहे आणि मी जे काही करतोय ते योग्य करतोय अशी मानसिकता सर्वांची असते.परंतु आपले उत्पन्न किती आहे, आपले खर्च किती आहे, आपल्यावर कर्ज किती आहे ही सर्व माहिती एका कागदावरती किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये आपण कधी व्यवस्थित मांडत नाही. आपण हि सर्व माहिती गोळा करण्यास घाबरत असतो कारण सर्व माहिती समोर आली की मग आपण वेगळयाच एका आर्थिक विवंचनेत गुंतलो आहे किंवा फसलो आहे असे समोर येते. परंतु हे कधी ना कधी होणार असते त्यालाच आपण टाळत असतो.तर आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती किंवा डाटा हा तुमच्या समोर असणे किंवा तो कुठेतरी लिहिला गेलेला असणे ही सर्वात पहिली पायरी आहे. त्यात तुमचे उत्पन्न किती, तुमचा खर्च किती, तुमच्यावर किती कर्ज आहे, त्याचे हफ्ते किती आहे, तुमच्याकडे सर्व खर्च जाऊन किती बचत उरते, तुम्हाला अल्प आणि मध्यम मुदतीत किती खर्च करायचा आहे, हि सर्व माहिती एकत्र करणे हि पहिली पायरी आहे.नेमके अनेक लोक हि पहिली पायरीच मजबूत करत नाही किंवा समजून घेत नाही. एका सर्वे नुसार ९० % लोक हे आपले उत्पन्न व खर्च याचा लिखित हिशोब ठेवत नाही. हिशोब लिहिण्यासाठी अशी कुठलीही पद्धत नाही तुम्हाला समजेल अश्या भाषेत लिहिले तरी चालेल. असे हिशोब लिखित ठेवल्याने नक्की आपल्याला कळते कि आपले उत्पन्न जाते तरी कुठे. विशेष करून इथं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि जे व्यवसाय करणारे लोक आहे ते त्यांच्या व्यवसायाचा हिशोब हा लिखित स्वरूपात ठेवतात परंतु नोकरी करणारे हिशोब लिखित स्वरूपात ठेवत नाही.
- आर्थिक ध्येय निश्चित करा! 🎯एकदा का तुमच्या आर्थिक परिस्थितीचा डेटा किंवा माहिती तुमच्याकडे आली की मग तुम्हाला तुमचे आर्थिक लक्ष समजून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला काय आर्थिक ध्येय तुमच्यासमोर ठेवायचे आहे हे पहिल्या पायरीमध्ये तुमच्याकडे जी काय माहिती आहे त्यानुसार ठरवायचे आहे त्यामध्ये.काहीही असू शकते जसे की विशिष्ट कालावधीमध्ये तुमचे कर्ज कमी करणे, विशिष्ट कालावधीमध्ये मला एवढी गुंतवणूक करणे किंवा विशिष्ट कालावधीमध्ये मला माझी घर घेणे, कार घेणे इत्यादी. आर्थिक ध्येय ठरविताना नेहमी कमी मुदतीचे, मध्यम मुदतीचे व दीर्घ मुदतीचे ध्येय निश्चित करायचे आहे.परंतु आर्थिक लक्ष किंवा उद्दिष्ट ठरवताना तुम्हाला तुमच्या आत्ताच्या परिस्थितीचा अंदाज हा असायलाच हवा जो आपण पहिल्या पायरीमध्ये त्याची माहिती लिखित स्वरूपात जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो.
- आत्ता कुठे आणि जायचे कुठे? गॅप ओळखा! 🗺️एकदा की पहिल्या पायरीमध्ये तुम्ही कुठे आहात हे तुमच्या लक्षात आले आणि दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला कुठे जायचे आहे हे लक्षात आले की मग तो गॅप भरून काढण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, किती जास्त पैसे कमवायचे आहे, किती खर्च कमी करायचे आहे, किती कर्ज कमी करायचे आहे हे सर्व तुमच्या लक्षात येते.जोपर्यंत तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला कसे पुढे जायचे हे समजणार नाही म्हणून तिसऱ्या पायरीमध्ये हा तुलनात्मक चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. की ज्यामध्ये आता तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे हा गॅप शोधायचा आहे.बऱ्याच वेळेस आपल्याला कुठे पोहचायचे आहे हे समजत नाही. आर्थिक बाबतीत कुठे पोहचायचे आहे हे जर ठरवायचे असेल तर तुम्हाला येणाऱ्या ५ वर्षात कुठले खर्च आहे हे जरी समजून घेतले तरी अनेक बाबी लक्ष्यात येतील. आर्थिक बाबतीत कुठे जायचे आहे ठरविण्यासाठी तुमचे सध्याचे वय किती आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या वयानुसार प्रत्येकाचं आर्थिक धेय्य वेगवेगळे असू शकते.
- ध्येयपूर्तीसाठी योजना तयार करा! 🗓️आर्थिक ध्येयांचा गॅप लक्षात आला की मग तुम्हाला तुमच्या आर्थिक ध्येय्याचा एक प्लॅन तयार करायचा आहे. यामध्ये तुम्ही तो प्लॅन अंमलबजावणीसाठी काय काय करण्याची गरज आहे हे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे.जसे की तुम्हाला एखाद्या गुंतवणूक सल्लागाराने सुचवल्याप्रमाणे गुंतवणूक करायची आहे किंवा खर्च कमी करायचा आहे किंवा कर्ज कमी करायचे आहे तर ते कसे करायचे ह्या सर्वांचा एक प्लॅन तुम्हाला तयार करायचा आहे. तो प्लॅन तयार करताना तुम्हाला तुमच्या घरातील मेंबर सोबत सुद्धा चर्चा करायची आहे कारण आलेले उत्पन्न कुठे खर्च होत आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्याच्यात कपात कशी करायची किंवा त्यातून बचत कशी करायची यासाठी घरातील सर्व लोकांची मदत व सहकार्य तुम्हाला हवे असते.थोडक्यात या पायरीमध्ये असा एक प्लॅन तुम्हाला तयार करायचा आहे की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयापर्यंत पोचणार आहे. यात तुमचे मध्यम आणि दीर्घ मुदतीचे धेय्य लिहायची आहे.
- प्लॅनचे मूल्यांकन करा आणि सुधारणा करा! ✅एकदा का तुमच्या हातात तुमचा आर्थिक प्लॅन आला की मग त्यावर काम करायचे आहे आणि हे करत असताना मधून मधून त्या आर्थिक प्लॅनचे मूल्यांकन सुद्धा करायचे आहे.मूल्यांकन याचा अर्थ आपण जे ठरवले आहे तिथपर्यंत आपण व्यवस्थित पोहोचत आहे का की त्यामध्ये काही बदल करावा लागेल. आपण ठरवलेले बचत किंवा गुंतवणूक किंवा कर्ज कमी करणे हे ठरल्याप्रमाणे होत आहे की नाही किंवा असे करताना आपल्या वरती खूप आर्थिक ताण येत आहे का हे सुद्धा बघणे गरजेचे आहे.जर आपण बनविलेला प्लॅन योग्य पद्धतीने पुढे जात नसेल तर त्यात बदल करणे सुद्धा कधी-कधी अनिवार्य होऊन जाते. अशा वेळेस आपण थोडे लवचिक सुद्धा असायला पाहिजे म्हणजे आर्थिक ताण आपल्यावर येणार नाही.
इतर आवश्यक माहिती
वरील पायऱ्या समजून सांगताना तुम्हाला इतर बेसिक माहिती जसे कि बचत आणि गुंतवणूक फरक, गुंतवणुकीचा परतावा आणि महागाई, गुंतवणूक परतावा व त्यावर भरावा लागणार आयकर, गुंतवनिक विकताना त्यावर भरावा लागणार आयकर याचे सुद्धा माहिती असणे जरुरी आहे. हि सर्व माहिती आहे तरीही तुम्हाला आर्थिक अर्थीक धेय्य कसे गाठायचे हे समजत नसेल तर ते वरील माहितीमधून समजेल.
📖🖋️ब्लॉग लेखन :
CA राम डावरे
मोबाईल नंबर : 9049786333
